ती आजही...

मीराच्या बहिणीचं - आनंदीच लग्न ठरलं. घरात उत्साहात सगळी तयारी सुरु झाली. होणारं सासर दहा-बारा किलिमीटर अंतरावर आहे हे आनंदी तीच्या मीरा ताई ला आवर्जून सांगत होती. ज्यामुळे तिला मनात येईल तेव्हा तिच्या आई ला भेटता येईल, असा आनंदीचा आज लग्ना आधीचा विचार. बोलताना सहज ती बोलून गेली कि, ताई तुझ्या लग्नाची आठवण होतेय, सगळं अगदी तसच चालू आहे. मीराला  गम्मत वाटली .... तेवढ्यापुरती.... पण डोक्यात विचारचक्र फिरू लागले. एव्हाना मीराच्या लग्नाला तब्बल दहा वर्ष झालेली. म्हटलं तर सगळं छान चाललेल. घर, गाडी, व्यवस्थित नोकरी आणि गोड मुलगा, सगळं काही होतं. मीरानेही लग्ना आधी असाच विचार केलेला, एकाच शहरात सासर - माहेर आहे मग कधिही माहेरी जाता येईल. लग्नानंतर काही दिवसातच खूप फरक जाणवू लागला. मीरा आणि मिहीर नवदाम्पत्य सासू - सासऱ्यांच्या घरातच राहत असल्याने ते सतत समोर असायचे. मिहीरला त्यांना भेटायला कोणताही विचार करावा लागायचा नाही. मीराला मात्र ठरवून माहेरी जावं लागायचं. त्यात नवीन लग्न झालेलं म्हणून प्रत्येक सुट्टीच्या दिवशी कोणी ना कोणी सासरचे नातेवाईक त्या चौघांना घरी जेवायला बोलावयाचे, कि मग मीराचं माहेरी जायचं लांबत जायचं.

सासरी रोजचा दिनक्रम चालू होता, मीरा  मात्र कुठे तरी हरवत चालली होती. अक्षरशः महिन्यातून एखाद वेळी माहेरी जाणं व्हायचं आणि त्यातही मीराचे आई - बाबा जावयाशी  गप्पा मारण्यात मग्न. २-४ तासात पुन्हा सासरी जायला निघायच. पण महिन्यातून २-४ तास वेळ मीराला काही पुरत नव्हता. सासरचे काही त्रास देत नव्हते पण सुनेकडून ज्या प्राथमिक अपेक्षा असतात त्या होत्याच. असं एखाद दिवस माहेरी नेऊन आणलं कि, सासरी सगळ्यांना वाटायचं कि, आत्ताच तर हि आई - बाबांना भेटून आलीये. पण मूलगा रोज आई - बाबांच्या सोबत राहतोय हे कोणाच्या लाक्षताच येत नसे. पुन्हा महिनाभर ठरलेला दिनक्रम सासरी सुरु....

घरात मीराने रोज जमेल तेवढी मदत केली तरी, दिवभर सासू - सासरे घर बघतात म्हणून मीरावर काही पडत नाही हा सूर होताच. मिहीर घरात किती कामं करतो याचा हिशोब मात्र कोणीच ठेवत नव्हतं. रात्री ८-९ वाजता ऑफिसामधून आल्यावर मीराने पोळ्या केल्या तरी, सासूबाईंनी कणिक भिजवलेलीच असते त्यामुळे मीराचं चांगलंय असच सगळ्याचं मत. मिहीर घरी आल्यावर स्वतःचे  हात पाय धुवून फक्त जेवायला बसायला हि चार - चारदा बोलवायला लावतो हा मात्र कौतुकाचा विषय. कारण कॉम्पुटरवर तो वाचत असतो आणि ऑफिसमध्ये किती काम करतो हे महत्वाचं होत सासू - सासऱ्यांना.

तिकडे मीराच्या आई-बाबांचही वय होत चाललेलं पण ते सगळं स्वतः च स्वतः करत होते. मुलीला आणि जावयाला सतत या ना त्या सणानिमित्त आहेर करत होते. सासरच्यांना विचारून जेवायला पक्वान्न ठरवत होते. मिहीर मीराच्या आई-वडिलांशी भेटल्यावर व्यवस्तिथ बोलायचा म्हणून तो चांगला जावई ठरत होता, पण मीरा सासू - सासऱ्यांच्या घरात राहून जमेल तेवढे काम करूनही कोणत्याही कौतुकास पात्र ठरत नव्हती.

दुसऱ्या घरात राहणं, वेगळ्या माणसांची सवय करणं आणि दुसऱ्याच्या घरात काम करणं हे प्रत्येक मुलीचं कर्तव्य का मानलं जातं? संस्कृतीच्या नावाखाली मुलीने आपल्या इच्छा दाबत जगावं आणि तरीही ती कुठेतरी कमी पडतेय हे तिला का दाखवून दिलं जातं? आणि हे सगळं आजकालच्या सुशिक्षत , सुधारीत घरात सहज दिसणारं चित्र. काही मुली सासरच्यांशी वाईट वागतही असतात पण सगळ्या तशा नाहीत. पण सुने कडून कायम अपेक्षा का? मुलाचे आणि मुलीचे दोघांचे आई-वडील वयस्कर असतात.  पण मुलीच्या आई वडिलांची जबाबदारी फक्त ते अगदी खूप म्हातारे झाल्यावर अथवा आजारी पडले तरच जावई घेतो आणि महान ठरतो. पण सुनेनं मात्र कायम अपेक्षांच्या भोवती फिरावं अशी सहजी अपेक्षा असते. मुलगा-सून सासू-सासऱ्यांसोबत राहत नसले तरी हे समीकरण काही बदलत नाही. मुलाकडे आल्यावर सासू-सासरे सुनेनी सगळं करावं आणि आता आपले वय झालेय हे सतत आवर्जून सांगतात. या उलट मुलीचे आई-वडील जर तिच्या घरी गेले तर ते मुलीला मदत कशी होईल हे पाहतात आणि जावयाचे छोट्या-छोट्या गोष्टींत कौतुक करतात.

मुलगा हा काही म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट नाही कि तो वीस वर्षांनी सुनेच्या रूपाने रिटर्न्स देईल. सुनेने जेवढी सासरच्यांची सरबराई करावी अशी अपेक्षा असते तेवढे जावई त्याच्या सासू-सासऱ्यांचे करतो का हा विचार केलाच जात नाही. किंबहुना जावया कडून तशा काही अपेक्षाच नसतात. अशाने पुन्हा मुलगाच वंशाचा दिवा आहे आणि मुलीचा जन्म झाला कि थोडी उदासी हीच विचारधारा तर आपण पुढे नेत  नाही ना? संसार दोघांचा असतो आणि मुलगा असो कि मुलगी आई-वडिलांना बाळ मोठं करायला सारखेच परिश्रम घ्यावे लागतात हि साधी समज कधी येणार?

मुलींना घरकाम शिकवलेच पाहिजे पण सोबत तेच काम मुलांनाही शिकवले गेले पाहिजे. मुलाने आणि मुलीने दोघांनी अर्थार्जन करावे का नाही हा प्रत्येक जोडप्याचा खाजगी निर्णय आहे. पण दोघांच्या आई-वडिलांना घरात समान स्थान दिले गेले पाहिजे. तसेच ज्या अपेक्षा जावयाकडून आहेत तेवढ्याच अपेक्षा सुनेकडून ठेवल्या पाहिजेत, तर घरात आनंद नक्कीच असेल. आपली संस्कृती खूप जुनी आहे आणि या सुनेकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षाही, बदल व्हायला वेळ लागेलच, पण आपल्या पासून सुरूवात करता येईल ........

टिप्पण्या